सध्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची ED कडून चौकशी सुरु आहे. काही नेते ED च्या कारवाईअंतर्गत अटक देखील झाले होते. दरम्यान आता आणखी एक वृत्त आले आहे. अहमदनगरचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ हे संचालक असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ED ने नुकतीच ३० तास चौकशी केली आहे.
दरम्यान बँकेतील एक कर्मचारी आज कामावर आल्यानंतर या कर्मचाऱ्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. ED चौकशीमुळे हा कर्मचारी तणावात होता, अशी माहिती मिळत आहे. सुनील लाड असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते जिल्हा मध्यवर्ती बँके वैयक्तिक कर्ज विभागातील व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. दरम्यान त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यानंतर लाड यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ईडीकडून जिल्हा बँकेत चौकशी
कोल्हापूर जिल्हा बँकेची दोन दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीकडून काल हसन मुश्रीफ यांच्या बँक खात्याशी संबंधित चौकशी करण्यात आली होती. त्यासाठी ईडीकडून जिल्हा बँकेत दोन वेळा धाड टाकण्यात आली. या दरम्यान, ईडीकडून बँक कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आलीय. त्यानंतर ईडीने जिल्हा बँकेच्या पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं.