केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना पक्ष दिले आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटात जल्लोष आहे. तर शिवसेना ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता आहे. दरम्यान, पक्ष आणि चिन्हामुळे शिंदे गटात म्हणजेच सध्याच्या शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची स्पर्धा सुरू आहे. मुंबई आणि ठाण्यात अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. त्यामध्ये, भायखळा येथील डॉन अरुण गवळींच्या भावाचाही समावेश आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा भायखळा परिसरात वर्चस्व गाजवणारा मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याचा उल्लेख केला होता. अरुण गवळी सध्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. मात्र त्यांचा अखिल भारतीय सेना नावाचा राजकीय पक्ष आहे. अरुण गवळी यांचे बंधू प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर पक्ष प्रवेशाचा फोटो शेअर केला आहे.
माजी नगरसेविका वंदना गवळी, प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.