फेब्रुवारी महिन्यात थोडी थंडी आणि थोडी उष्णतेला सुरवात असे काहीसे वातावरण असते. परंतु या वर्षी फेब्रुवारीत उष्णतेने कहर करण्यास सुरवात केली आहे. अनेक ठिकाणी उष्णता सरासरीपेक्षा चांगलीच वाढली आहे. काही ठिकाणी आभाळ येत आहे. साधारण मार्चनंतर उष्णतेत वाढ होते. मे मध्ये उष्णतेचा कहर असतो. परंतु यंदा फेब्रुवारीमध्येच उष्णता वाढली आहे.
फेब्रुवारीत एवढी उष्णता का?
उत्तर आणि पश्चिम भारतासह जवळपास संपूर्ण देशात सध्या तापमान विक्रमी उच्चांक गाठत आहे. दिल्लीत फेब्रुवारी महिन्यातच तापमान ३३ अंशांवर पोहोचले, जे सरासरीपेक्षा ७ अंशांनी अधिक आहे. सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्यात जोरदार वेस्टर्न डिस्टर्बन्स दिसून येतात, ज्यामुळे पाऊसही पडतो आणि तापमानात फारशी वाढ होत नाही, पण यंदा मजबूत ऐवजी कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहेत. तेही एकापाठोपाठ एक, ज्यामुळे तापमानात वाढ होत आहे.
उष्णता वाढीला दोन घटक कारणीभूत
‘स्कायमेट’च्या म्हणण्यानुसार, तापमानातील या असामान्य वाढीला हवामानाचे दोन घटक कारणीभूत असू शकतात. पश्चिम हिमालयाच्या दिशेने हळूहळू पश्चिमी विक्षोभ येत असला तरी तो विशेष पाऊस किंवा हिमवृष्टी करण्यास सक्षम नाही. शिवाय या वेस्टर्न डिस्टर्बन्समधला फरक फारच कमी आहे. त्यामुळे उत्तरेकडून थंड वारे वाहत नसल्याने तापमानवाढ रोखता येत नाहीये.
दुसरे म्हणजे ईशान्य अरबी समुद्रावर असलेले प्रतिचक्रीवादळ. आता तो नैऋत्य राजस्थानकडे सरकला आहे. या प्रतिचक्रामुळे बलुचिस्तान, दक्षिण सिंध आणि थार वाळवंटातील उष्ण आणि कोरडे वारे वायव्य भारतासह गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकात पोहोचत आहेत. हवामानातील कोणत्याही महत्त्वपूर्ण हालचालींचा अभाव, तीव्र सूर्यप्रकाश, कोरडे आणि गरम वारे हे तापमानातील या असामान्य वाढीस कारणीभूत आहेत.