राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील ४० लाख लाभार्थ्यांना स्वस्त धान्य देण्याची योजना बंद झाल्यानंतर धान्याऐवजी थेट लाभार्थीच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वस्त धान्य दुकानातून दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ देण्याची योजना सुरू केली होती.
५९ हजार ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना याचा लाभ मिळत होता. या लाभार्थ्यांना गव्हाचे वितरण जुलै २०१२ पासून तर तांदूळ वितरण सप्टेंबर २०२२ पासून बंद करण्यात आले होते.
कसे मिळतील पैसे?
कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात सर्वांचे पैसे जमा करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती सध्या मिळाली आहे. लाभ मिळण्यासाठी आधार संलग्न असणे अनिवार्य असेल.
काय आहे योजना?
अन्न व नागरी पुरवठा विभागाने एका व्यक्तीला दरमहा ७५० रुपये अर्थात वर्षाला ९ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. चार जणांच्या कुटुंबाला वर्षाला ३६ हजार रुपये मिळणार आहेत. या पैशातून ही कुटुंबे बाजारातून गहू आणि तांदूळ खरेदी करू शकतात. त्या गरजेतून वाचलेला पैसा इतर गरजा भागवण्यासाठीही वापरला जाऊ शकतो.
हे आहेत १४ जिल्हे
बुलढाणा
अकोला
वाशिम
यवतमाळ
अमरावती
वर्धा
औरंगाबाद
जालना
परभणी
नांदेड
उस्मानाबाद
बीड
लातूर
हिंगोली