नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित उमेदवारांचा शपथविधी सोहळा विधिमंडळ मंडळात पार पडला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदार विक्रम काळे, सुधाकर आडबळे, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे, धीरज लिंगाडे यांनी सदस्यपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला आमदार आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक मतदार संघातील आमदार सत्यजित ताबे यांच्या शपथ घेतेवेळी समर्थकांनी घोषणाबाजी केल्याचं सभागृहात पाहायला मिळालं.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिक्षक मतदार संघातून तीन तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्व सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राज्यात सर्वात चर्चेत राहिलेल्या सत्यजित तांबे यांच्या शपथविधीवेळी समर्थकांनी एकच वादा, सत्यजित दादा… अशी घोषणाबाजी केली. तांबे समर्थकांच्या या घोषणाबाजीतच बाजूलाच उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांनी एकच दादा, अजित दादा… अशीही घोषणाबाजी केली. त्यामुळे, सर्वांनाच आश्चर्य वाटले. तसेच, सभागृहातील या घोषणाबाजीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सत्यजित तांबे यांच्या विजयाचा अजित पवारांना होता विश्वास
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसला कानपिचक्या दिल्या होत्या. काँग्रेसने सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली असती तर असे काही झाले नसते, असे पवार म्हणाले. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज नाईलाजास्तव केल्याचेही त्यांनी सांगितले. सत्यजित तांबे यांचे वडील आणि आजोबा हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे आता आघाडीवर असून त्यांची निवड होईल, असे मला वाटते. ते निवडून आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील, असे पवार त्यावेळी म्हणाले होते.