चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दिंडोरी, नाशिक, निफाड आणि सिन्नर या तालुक्यात दाखल झालेले दावे व हरकती जानेवारी अखेरपर्यंत निकाली काढाव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांकडून देण्यात आले.
दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप सीपीआय रेडस्टारने केला आहे. महामार्ग मंत्रालय बागायती जागा जिरायती दाखवत आहे, अधिकाऱ्यांनी याबात काही महती देत नाहीत त्यामुळे भूसंपादनाबाबत शेतकरी संभ्रमात असल्याचे बोलले जात आहे.
केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेअंतर्गत सुरत-चेन्नई १२७० किलोमीटर च्या ग्रीनफिल्ड हायवेवर बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग नाशिक, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातून जाणार असून नाशिक जिल्ह्यातील सुरगाळा, पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक आणि सिन्नर या सहा तालुक्यांमध्ये हा महामार्ग जाणार आहे. नाशिक, निफाड, सिन्नर आणि दिंडोरी या चार तालुक्यांमध्ये भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढली आहे.
गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पासाठी जमिनीचे सर्वेक्षण, मोजणीची प्रक्रिया सुरू आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांची परवानगी न घेता शेतात सॅटेलाइट मार्कर बसविण्यात आले होते. त्यानंतर प्रांतांच्या वतीने संबंधित तालुक्यात झालेल्या सुनावणीदरम्यान केवळ नोंदणीसंदर्भात हरकती मागविण्यात आल्या होत्या.
शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नाही. शासन दरबारी बागायती जमिनींची जिरायती, अशी नोंद करण्यात आली. या महामार्गावर पाण्याचा निचरा होण्याची शक्यता नाही, त्यामुळे भविष्यात उत्पन्न मिळणार नाही. मोठ्या प्रमाणात वाहतुकीमुळे प्रदूषणाची पातळी वाढेल आणि कृषी उत्पादनावर परिणाम होईल. एलिव्हेटेड रोड तयार होत असल्याने तेथे रोजगार निर्मितीची शक्यता नाही . या समस्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री व पुनर्वसनमंत्र्यांनी संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना जगण्याचा सक्षम पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महामार्गाची वैशिष्ट्ये
– या महामार्गामुळे नाशिक सुरत दरम्यानचे अंतर १७६ किलोमीटरवर येणार
– नाशिक ते सोलापूर अंतरात ५० किलोमीटरची कपात होणार आहे
– या महामार्गामुळे सुरत चेन्नई हे १६०० किलोमीटरचे अंतर १२५० किलोमीटरपर्यंत कमी होणार.
– सुरत, नाशिक अहमदनगर, सोलापूर, हैदराबाद, चैन्नई ही महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत.